रोहित पक्ष्यांच माहेरघर भिगवण


 पक्षीप्रेमींच पुण्यापासुन जवळच ठिकाण म्हणुन ओळख आहे ती पुणे – सोलापुर रस्त्यावरील उज्जनी धरणाचे मागील पाणलोट क्षेत्र भिगवण पक्षी अभयारण्याची. हिवाळा सुरु होताच मार्च महिन्याचे अखेरीपर्यंत यापरिसरात लगभग असते शेंदरी गुलाबी लाली ल्यायलेल्या रोहित पक्ष्याचीं व इतर स्थलांतरित पक्षाची त्यांना सोबत असते पक्षी निरीक्षक पर्यटकांची. जवळपास 250 पक्षी या कालखंडात दृष्टीस पडतात. महाराष्टातील महत्वाच्या पक्षी अभयारण्यातील भिगवण तथा कुंभारगाव बारामती जवळील  पक्षी अभयारण्य आहे.
                        कोणत्याही पक्षी निरीक्षणाची वेळ असते ती सकाळी आठ ते दहा व सायंकाळची पाच ते सात अशी सावळी सावळी. सोबत दुर्बिण, डी एस एल आर कमेरा, टायपाड इ साहित्य सोबत घेऊन जाणे दुग्धशर्करा योग घडवुन आणतात त्यामुळे शक्य असल्यास या गोष्टी सोबत बाळगाव्यात.
                        आम्ही भिगवण येथे सकाळी आठ वाजता नावेतुन जलाशयात पक्षी निरीक्षणास गेलॊ. यावेळी आमच्या सोबत आमचा गाईड होता अतुल दादा. शांत समंजस नीट माहिती देणारा नि पक्ष्यांजवळ जाताना नाव हाताने वल्हवत खास ठिकाण शांतपणे दाखवणारा. आपण येथे भेट देणार असाल तर त्याच्या बरोबर जाण्याचा आनंद घ्या.  ( दुरध्वनी क्र 9767973020)  ज्याप्रमाणे वारक-यांची पंढरी तशी पक्षी प्रेमींची ही भीमाकाठची पंढरी. यातील स्टार आकर्षण म्हणजे दर्दी नि गर्दींची नजर असते ती जवळपास मोराइतक्या आकाराचा लांब मान व पाय असणा-या स्थलांतरित पांढ-या शेंदरी गुलाबी रंगाच्या हुक चोचीच्या रोहित तसेच अग्नीपंख हे नाव दिमाखात मिरवणा-या गोड पक्षाकडे. अग्नीपंख पक्षी थव्यानी विहार करतॊ पाण्यात चालताना हे परेड करत चालतानाचे दृश्य डोळ्यात भरुन घेताना आमचे रितेपण सिद्ध होत होते. रोहित पक्ष्याच्या परिक्षेत्रात माणसांचा वावर झाल्यास पटकन अनुभवी पक्षी इतरांना सावध करतो नी गुलाबी काळे पंख नि पाच फ़ुट उंचीच्या पक्ष्याची ती सहज झेप आपल्याला श्वास रोखुन धरायला लावते. त्यांच ते शिस्तबद्ध ओळ करुन उडण मनाला त्यांचे वेगात सामावुन घेत. यावेळी शालेय जीवनातील कवायती परेडची आठवण प्रकर्षाने येत राहिली. भीमेच्या तीरावर यावेळी पाणपक्ष्यांची मांदियाळी होती.





                       भीमा तटावर खाद्य टिपणारा काळा तपकीरी चकाकी असणारा डोक्यावर शेंदरी टिपक्यांचा काळा शराटी, काळे डोके मान असणारा बाकदार मानेचा बगळ्याहुन मोठ्या आकाराचा पांढरा शराटी निवांत पाण्यात मान वर खाली करताना किंवा नदीचे पाणी कमी झाल्याने उघड्या पडलेल्या गाळमातीवर पांढरा शराटी निवांत फ़िरताना दिसला. शराटी भक्ष्य पकडताना चोचीचा वापर सांडशी सारखा करतो.
                       येथेच पाण्यात गुलाबी तुरकाटी पायांचा, लांब बारीक तीक्ष्ण चोचीचा शेकाट्या उथळ पाण्यात चालताना पाहुन याचा पाय किती नाजुक असा उदगार आलेशिवाय राहत नाही. याचवेळी आ मच्या सोबतच्या लोकांनी आणलेला खाऊ टिपण्यासाठी हिवाळि सुरय पक्ष्यांनी गर्दी केली होती. नावे भोवती फ़ेरा धरला होता शेपटी दुभंगलेला पिवळ्या चोचीचा नदीसुरय आणी काळ्या चोचीचा हिवाळी सुरय डोलदार गिरकी घेत अवकाश विहंग करत होते. त्याच्या पाण्यात सुर मारणेच्या पद्धतीने सुरय हे नाव सार्थ होते असे वाटते. गोंगात करत पाण्यात इतक्या सफ़ाईदारपणे सुर मारणे पाहुन त्या म्हणीचा अर्थ कळतो.
                      त्याचप्रमाणे येथे पाणकावळे,  चिलखती रंगाचे निवांत पाण्यात लुटुलुटू पोहणारे बदक प्लवा किंवा राखी बदक, थापाट्या, तलवार बदक आजुबाजुच्या खाजणात पिवळी केशरी रंगांच्या बदकांचा थवा पाण्यात विहरताना दिसला असा हा प्रथम परिचय होता चक्रवाक बदकांसोबतचा. आमची चाहुल लागताच काही वेळात तो बदक उडाला. बाजुला पाण्यात टिटवी उभ्या होत्या.

               येथे मोठ्या प्रमाणात दिसतात ती तुरुतुरु धावणारी मानेवर काळा पट्टा असणारे चिखला अगदी चिमणी इतका किंवा थोडा लहानच चणीचा.आणि त्याच कुळीतले स्थलांतरित हिरवा तुतारी नि कवड्या तुतारी.  या तुतारींच्या थव्यात सहज वावरणारा पिटुकला चिखल्या अगदी भावतो.
                  भिगवणला सहज दिसतो तो अडकित्याच्या चोचीचा मुग्धबलाक त्याचे सोबतीला त्याचेपेक्षा मोठा काळा पांढरा गुलाबी पिसे असणारा चित्रबलाक सकाळच्या उन्हात पंख पसरुन बसलेला दिसला. त्याचप्रमाणे बगळ्यांच्या कुटुंबातील माझा प्रिय ध्यानमग्न राखी बगळा खोल पाण्यात आपल्याच विश्वात मश्गुल होता. त्यांच्या सोबतीने काळ्या पायांचा बगळ्यापेक्षा मोठा उलतण्यासारखी लाकडी चोच असणारा चमचा शैवाळात रमलेला दिसला. सोबतीला पांढरी पाणकोंबडी शेपुट आपटणारा पांढरा धोबी यासा-यांची वर्द्ळ प्रपंच पाहत असताना दुपारची उन्ह परतीची साद घालतात. मनात विचार येतो इतके सारे भिन्नता घेउन असणारे निसर्गाचे दान गुण्यागोविंदाने नांदते तीच विविधतेतील एकता. निसर्गाने प्रत्येकाला एक बलस्थान दिले आहे याच एकतेसाठी पण माणूस मात्र इतरांच्या बलस्थानांना दुर्लक्षित करुन नांदण विसरत चालला आहे.




               अशा या पंढरीचे वारकरी नक्की बना .





Comments

  1. अफलातून फोटो
    अप्रतिम सौंदर्य
    सुंदर लेख

    ReplyDelete
  2. Khupach chaan lekh.... Keep writing

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर. आता या ब्लॉगमधील निवडक लेखांचं सुंदर पुस्तक "चौकस भटकंती" या नावाने प्रकाशित झालं आहे. www.esahity.com येथे ते विनामूल्य उपलब्ध आहे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार

पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट