पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट


  इस्लामपुर पासुन जवळचा पिकनिक स्पाट म्हटल कि नजरेस येते बहे रामलिंग बेट. इस्लामपुरपासुन आठ एक किलोमीटरवर वसलेल कृष्णामाईच्या पात्रातील छॊट बेट. पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर पाण्याखाली जातो. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य आहे. अनेक हनुमान उपासक श्रावणात व शनिवारी येथे गर्दी करतात. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक रामलिंग बेट येथे आहे. बेटावर जाण्याकरिता नदीतुन बेटापर्यंत जाण्यासाठी एक छॊटा पुल पार करावा लागतो. पुलावरुन जाताना कृष्णेचे विशाल पात्र डोळ्यात भरते. बाजुचे फ़ेसाळणारे पाणी स्वागत करते, आकाशात अनेक पाणपक्षी विहरत असतात, या विश्वात प्रवेश करताना आपल्यालाही मुक्त झाल्याचा भास होतो. बेटावर काही सामाजिक संस्थेने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.

         बेटावर प्रवेशकेल्यानंतर मध्यावरील उंचवट्यावर यादवकालिन सुंदर शिवालय आहे. त्याच्या पाठीमागील बाजुस हनुमान मंदिर असुन त्यातील मुर्ती भव्य दिव्य आहे. त्याच्या बाजुस गणपतीचे मंदिर आहे.या भागातुन संपुर्ण बेटाचे दर्शन घडते. तेथुन पुढे गेल्यानंतर राम –लक्ष्म्ण- सीतेचे मंदिर आहे.या मंदिराच्या डाव्या बाजुस उतरुन गेल्यानंतर छॊटा धबधबा आहे. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेता येतो. या भागात पर्यटकांची गर्दी असते.येथे पात्रात बगळे., पाणकावळे दिसतात येथील पात्र प्रवाही आहे.
          उजव्या बाजुस नदीचे पात्र थोडे विस्तीर्ण आहे. पात्रात बरेच खडक पाण्यातुन डोके वर काढुन उभे आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह तसा कमी आहे त्यामुळे पाणथळ येथे तयार झाली आहे. येथुन शांत लयबद्ध पाणी वाहत असते. तसेच लोकांची गर्दी नसते, त्यामुळे पक्ष्यांच्या दर्दींकरिता येथे खास मेजवानी मिळु शकते. येथे पाण्यात सुर मारणारा पाठ सुकवत बसलेले पाणकावळा, झाडांवर ध्यानस्थ बसलेला खंड्या, आकाशात गिरकी घेत पाण्यात सुर मारणारे दुभंगलेल्या शेपटीचे नदीसुरय मुक्तपणे विहरत असतात. या पात्रात पाकोळ्या्चा गलबलाट सुरु असतो. यांची मातीची घरटी पुलाखाली आहेत. शेवाळात भुरा बगळा किडे टिपताना हमखास दिसतो. आपले बगळे खडक पकडुन पाण्यात डुबके घेत असतात या प्रवाहातील पाणकणसांजवळ टिटवी, पाणकोंबडी, लाजरी दुडुदुडू चालीने अलगद हवाई पद्धतीने चालताना दिसते. मला आकाशात भिरभिरणा-या पाकोळ्या आणि आकाशात विहरणारे सुरई यांच्या दुभंगलेल्या शेपट्या पाहिल्या कि त्यांच्या उडण्याचा अभ्यास करण्याची निकड वाटते. या खडकांच्या दुनियेत आपण मग्न असताना काळ डोक, बाकदार चोच असलेला पांढरा शराटी दिसतॊ. या सगळ्या पक्ष्यांच्या दुनियेत पांढरा राखाडी रंगाचा उंच राखी बगळा पाण्यात एकटाच ध्यानमग्न दिसतो. ज्यावेळी मनाला शांतता, एकाग्रते (CONCENTRATION) ची गरज वाटते तेव्हा मी राखी बगळ्याला भेटायला बेटावर असुशीने येते. त्याच हे रुप मला नेहमी प्रेमात पाडत नव्यान.

           नोव्हेंबर महिना दुसरा शनिवार सुट्टी असल्याने निवांतपणा अनुभवायला बेटावर गेले नेहमीच्या रस्त्याने न जाता उजव्या बाजुच्या खडकातुन चालु लागलो, पात्रातील आतील बाजुच्या एका खडकावर बसुन चक्रांग बदकांची पाण्यात विहरणारी शांत जोडी पाहत असताना अचानक समोरच्या खाजणात पिवळी केशरी रंगांच्या बदकांचा थवा पाण्यात विहरताना दिसला असा हा प्रथम परिचय होता चक्रवाक बदकांसोबतचा. आमची चाहुल लागताच काही वेळात तो थवा उडाला. बाजुला पाण्यात टिटवी उभ्या होत्या. तेथेच पांढरा काळी चोच व काळी पाठ असणारा लांब गुलाबी रंगाचा काटकी पाय असणारा शेकाट्या पाण्यात खाद्य शोधत होता, लंबुटांगा पाहिला कि पाय कधिही तुटेल असे वाटते. अशा पक्षांच्या दुनियेत आपण रममाण होतो. दुपारची वेळ होती सुर्य डोक्यावर आला होता, त्यावेळी काळा पांढरा कवड्या खंड्या गिरकी घेत गेला त्याची गिरकी डोळ्यांना चकवा देत गेल्यासारखी वाटली.  त्याचबरोबर काळ्या पांढ-या रंगाचा पट्टा असणारा हुदहुद, लालबुड्या, चिरीक. मुनिया, शिंजीर तसेच हिवाळ्यात करडा परीट तसेच तारांवर काळा पांढरा परीट पक्षी शेपटी बडवत उडताना दिसतात अशी पक्ष्यांची मेजवानी अनुभवण्यासाठी रामलिंग बेटावर वेळ काढुन भेट द्यायला हवी.  


                                    राखी बगळा


                              चक्रवाक बदक


कवड्या खंड्या



                                    शेकाट्या

Comments

Popular posts from this blog

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार