श्री क्षेत्र मलिक्कार्जुन तथा विलासगड



   
                                           
         पुणे- बैंगलोर महामार्गावरील कराड पासुन 32 कि.मी अंतरावरील येडेनिपाणी गावापासुन आष्टा रोडवर थोडे पुढे गेल्यास अंदाजे दिड कि.मी अंतरावर श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येडेनिपाणी असा फ़लक आपण पाहतो. तेथुन समोरील डोंगरावरील फ़िक्या अबोली रंगाने रंगविलेले मंदिर दिसते.(सध्या रंगवले आहे) आपली गाडी या मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाते तेथुन मंदिरापर्यंत 30 मिनिटात पोहोचतो, हाच तो विलासगड मात्र स्थानिक लोकात येथील सध्या असणा-या मल्लिकार्जुन मंदिरावरुन हे ठिकाण मल्लिकार्जुन डोंगर या नावाने प्रसिद्ध आहे.
         येथे मंदिरापर्यंत जाण्याकरिता पाय-या केल्या आहेत. आपण काही पाय-या चढुन गेल्यानंतर नव्या पाय-या संपुन जुन्या पाय-या लागतात व डावीकडे जाणारा रस्ता लागतो. तेथुन पाय-या सोडुन आपण डावीकडे गेल्यास एक सुंदर खोल पाण्याचे टाके लागते. या टाक्यास खालची गंगा म्हणतात. येथे आपणास जलनियोजनाचे उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो पावसाचे पाणी थेट टाक्यात न जाता वेगवेगळ्या खडकाच्या पोडीत साठते व तेथुन टाकात जाते. त्यामुळे टाक्यात नितळ पाणी साठते.



 त्याच्या बाजुस एका गुहेत शंकराची पिंड त्यासमोर नंदिची मुर्ति आहे. ती पाहुन आपण थोडे वर चढुन आल्यावर पाय-या लागतात तेथुन चढुन गेल्यास जेथे पाय-या संपतात तिथे उजव्या बाजुस दोन कमानी असलेली इमारत लागते हि  शिवोत्तर कालिन शैलीत बांधलेली आहे तिच्या उजव्या बाजुस एक टाके आहे. या पाय-यांच्या शेजारी पाहिल्यास तटबंदीचे अवशेष आहेत हे यादवकालिन बांधकामाप्रमाणे वाटतात.(step pattern) 
         तेथुन पुढे मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर डाव्या बाजुस भैरवनाथाचे मंदिर लागते या मंदिरात एका देवीची मुर्ति असुन हे एक लेणे असुन ते डालिमा देवीचे आहे. त्यापुढे एक ओसरी असुन तिथे आत गेल्यास दोन लेणी असुन यांची बरीच पडझड झाली आहे. सध्या त्याचा वापर भांडारगृहाकरिता करतात; त्यापुढे मुख्य लेणी असुन दर्शनी भाग हा त्याचे वास्तु वैशिष्ट्यांवरुन यादवकालिन वाटतो. आत गेल्यावर डाव्या बाजुस कोटीलिंग, सतिशिळा,त्याच्यापुढे शिव पार्वतीची ध्यानस्थ मुर्ति आहे. समोरील बाजुस वीरभद्र लेणी तथा मंदिर असुन तेथे पिंड आहे. येथेच डाव्या हातात धनुष्य व उजव्या हातात खडग घेतलेल्या विरभद्राची मुर्ती आहे. या दालनात जाण्याकरिता दरवाजा लहान असुन वाकुन जावे लागते. त्याचे दर्शन घेऊन आल्यावर मंडपात आपणास एक लेणे रिकामे आहे त्याच्या बाजुच्या लेण्यात कार्तिक स्वामीची मुर्ती आहे. त्याच्यासमोर राम सीता.,गंगा.,नागशिळा असुन तेथेच गणपतीची सुंदर कातळातील मुर्ति आहे. विरभद्र लेण्यासमोर नंदी आहे. उजव्या बाजुस एक शिवलिंग असुन तेच मल्लिकार्जुन त्याच्या समोरिल गुहेत (लेण्यात) वाकडा नंदी असुन तेथे सप्तमातृकांचा पट आहे. येथील स्तंभ बाहेरील स्तंभापेक्षा वेगळे असुन आकाराने मोठे आहेत तसेच स्तंभशिर्षाशी उलटा कुंभ आहे. मंदिराच्या समोर दोन दिपमाळा आहेत. बाजुस नगारखाना आहे.
           तेथुन पुढे आल्यास चुन्याचा घाणा दिसतो. घाण्याशेजारी ही पाण्याची पोडी/टाक असुन सध्या त्यामध्ये पाणी नाही. या गडावर सध्या कोणताही बुरुज वा तटबंदिचे अवशेष शिल्लक नाहीत.  या गडाचा वापर टेहाळणीकरिता करणेकरिता करणेत येत असावा. घाण्यापासुन पाय-या चढुन वर गेल्यानंतर एक मशिद व दर्गा लागतो वरती विठ्ठल रुक्मीणी, कृष्णाचे मंदिर आहे. त्याच्या समोर दोन खंदक असुन त्यात उतरणेकरिता पाय-यांची योजना आहे ते धान्याचे कोठार असावे. मशीद्च्या बाजुस एक आदिलशाही शैलीतील इमारत दिसते, तिच्या दोन्ही कमानी व इमारत सुस्थितीत आहे. ती गडावरील सध्या उपलब्ध एकमेव बांधकाम आहे. त्याच्या पुढे एक तळे असुन ते घोडतळे म्हणून ओळखतात येथील पाण्याचा वापर घोड्यांना पाणी पिण्याकरिता केला जात असावा. तेथुन परत धान्याच्या कोठारापर्यंत आल्यावर तेथुन खाली एक वाट जाते थोडे अंतर उजवीकडे उतरुन गेल्यावर एक पाण्याचा टाक लागतॊ. त्यास गंगा म्हणतात हिला स्थानिक वरची गंगा म्हणतात.  तेथे उतरणेकरिता दगडी कोरलेल्या पाय-यांची सोय आहे. या टाकातील पाणी या लेण्यातील सर्व टाकात स्वच्छ आहे. तेथुन पुढे वळसा घालुन आलेस पुन्हा समोरील पाय-यांपर्यंत पोहचता येते.
       विलासगडास असा पुरातन इतिहास असुन हे देखील गजपृष्ठाकार मुळचे  नाथपंथिय लेणे असावे कारण नाथपंथिय लेण्यांचे स्थापत्यावर बौद्ध लेण्यांचा प्रभाव असुन शिव ही नाथपंथीय आराध्य देवता असुन या मंदिरात दोन सयोनी शिवलिंग़ सप्तमातृकापट आढळतो. आजकाल उपलब्ध विज़ाननिष्ठ पद्धतीने कालगणना केल्यास तिचा प्रकार निश्चीत करता येण सहज शक्य होईल. लेण्याचे पुढे  संस्करण होऊन सध्याचे शिव मंदिर अस्तित्वात आले आहे. यादवकालातील गडांचे प्रकारामध्ये गुहांचा गड म्हणून वापर होत असलेने गुहागड हा गडप्रकार आढळतॊ त्या अनुशंगाने या मंदिरातील समोरिल मंडप हा यादवकाळाची साक्ष देत असल्याने तसेच सध्याचे मंदिराच्या तटासमोरील बाजुस डोंगराच्या कडेस आजही दगडी बांधकाम आहे यावरुन ह किल्ला (गुहेचा वापर किल्ला असा) यादवकाळापासुन अस्तित्वात असावा. महाशिवरात्री तसेच श्रावणात येथे यात्रा असते भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.अशी लेणी-गड अन मंदिर असणारे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येडेनिपाणी आपणास साद घालत आहे.



संदर्भ
·         अंतराळजाळावरील माहिती (विकीपीडीया)
·         लेणी महाराष्टाची - ङा. दाऊद दळवी





Comments

  1. Khupach Sunder lekh..... Keep Writing Madam

    ReplyDelete
  2. हो, खूपच विस्तार पुर्वक माहिती मिळाली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार

पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट